( मुलाणी )
वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या 'आय' प्रभाग समिती मधील नाल्यावर उभारलेली वादग्रस्त खाऊ गल्ली मंगळवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवली. परंतु , त्यामुळे नवीन समस्या उभ्या राहणार आहेत. अधिक माहितीनुसार, 'आय' प्रभाग समिती मधील नरवीर चिमाजी मैदानालगत नाल्यावर उभारण्यात आलेली खाऊ गल्ली संस्कृती इमारती समोर वसवण्यात आली आहे. सदरची जागा महाराष्ट्र शासनाची असून पालिकेच्या आरक्षित भूखंडावर बेकायदेशीर रित्या बनण्यात आलेली संस्कृती ही इमारत निष्कासन करण्यात यावी याबाबतचे पत्र तहसीलदार वसई यांनी आयुक्तांना सादर केले होते. त्यावेळी सर्वे क्रमांक ४१ ई १ या जागेचा वाद समोर आला होता.या जागेलगत पालिकेने बेकायदेशीररित्या कंटेनर्स ठेवले होते. हे कंटेनर्स हटवण्याची मागणी मंडळ अधिकारी वसई यांनी महसूल विभाग व महानगरपालिका यांच्याकडे केली होती. त्यावर कारवाई प्रलंबित असतानाच तत्कालीन सहाय्यक आयुक्त अलका खैरे यांनी खाऊ गल्ली साठी हीच वादग्रस्त जागा निवडली. यामुळे भविष्यात विविध समस्यांना चालना मिळणार आहे. तसेच सदरचा परिसर हा खाडी प्रदेश असून सांडपाणी जाण्यासाठी खुला नाला आहे. त्यामुळे स्वच्छतेचा, आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी डास ,मच्छर यांचे साम्राज्य या परिसरात असल्यामुळे पालिकेने ही जागा निवडताना कुठलीच खातरजमा केली नसल्याचे सिद्ध झाले आहे. पर्यायी जागेबाबत पालिका अधिकाऱ्यांचा अभ्यास याप्रकरणी कमी पडल्यामुळे सदर जागेचा वाद नव्याने समोर येण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कुठलीच माहिती नाही. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे. ** अभ्यासिका अजूनही गटारावर **तात्कालीन शहर अभियंता प्रकाश साटम यांच्या दिव्य संकल्पनेतून याच धोकादायक नाल्यावर अभ्यासिका, खेळाडूंसाठी कंटेनर उभारण्यात आली. या अभ्यासिकेत गरीब गरजू घरातील मुले येत असतात. त्यामुळे ही अभ्यासिका नाल्यात कोसळणार नाही का? असा प्रश्न करदात्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. धोकादायक नाल्याचे कारण पुढे करून पालिकेने असे नाले रिकामी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाऊ गल्लीवर केलेल्या कारवाई नंतर पालिकेने स्वतःच्या अभ्यासिकेवर कारवाई करणे अपेक्षित आहे. असे नागरिकांचे मत आहे. कोट्स : अजित मुठे - उपायुक्त नियंत्रण अधिकारी 'आय' प्रभाग समिती यांना विचारणा केली असता, जागेच्या वादा बाबत आपल्याला माहिती नाही. याबाबत प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांना माहिती असावी. शशिकांत पाटील सहाय्यक आयुक्त 'आय' प्रभागजागा महाराष्ट्र शासनाची आहे किंवा नाही याबाबत आपल्याला कुठलीच कल्पना नाही. आपण आत्ताच या विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे माहिती घ्यावी लागेल. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.