दिनांक 18 ऑक्टोंबर 2025 वार- शनिवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी)
/ मुलाणी /
मुंबई, दि. 14 ऑक्टोबर 2025 — मुंबईतील अंधेरी स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) टीमने मोठी कारवाई करत लोकल ट्रेनमध्ये अनधिकृतपणे तांत्रिक बाबांचे पोस्टर लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 22,600 पोस्टर जप्त करण्यात आले आहेत.
मुखबिराच्या खास माहितीनुसार MMCT मुख्यालयाच्या टीमने निरीक्षक बोरिवली यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंचार्ज SIPF संतोष सोनी, ASI शीतला सिंह व ASI विवेकानंद माळी यांनी अंधेरी स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. 1 वर एका व्यक्तीस लोकल ट्रेनमध्ये पोस्टर लावताना रंगेहात पकडले.
सदर व्यक्तीचे नाव अब्दुल समद उर्फ सिब्बो (पुत्र इरशाद खान) असे असून चौकशीत त्याने सांगितले की, त्याचे दोन साथीदार मीरा रोड येथील शीतल प्लाझा, सी विंग येथे राहतात आणि तेही या प्रकारात सहभागी आहेत.
पथकाने पंचांना बोलावून निशानदेही पंचनाम्याच्या आधारे त्या ठिकाणी छापा टाकला असता, दोन व्यक्ती — मोहम्मद तालिब (पुत्र जमील) आणि मोहम्मद उजैफा (पुत्र सलीम) रूममध्ये उपस्थित आढळले. त्यांनी चौकशीत सांगितले की, ते मागील तीन–चार वर्षांपासून मुंबईत राहत असून विविध तांत्रिक बाबांचे पोस्टर चर्चगेट ते विरार दरम्यानच्या स्थानकांवर व लोकल ट्रेनमध्ये सकाळच्या वेळेत चिकटवतात. त्याबदल्यात त्यांना दररोज सुमारे ₹500 मिळतात.
पंचांच्या उपस्थितीत खोलीची तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात पोस्टर आढळले —
बाबा समीर जी – 560
बाबा खान बंगाली – 8,400
नजरअली बंगाली – 9,300
बाबा बशीर खान – 2,800
बाबा उमर खान – 1,540
अशा प्रकारे एकूण 22,600 पोस्टर जप्त करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया पंचांच्या उपस्थितीत व्हिडिओग्राफीसह पार पाडली गेली.
पुढील चौकशीत मोहम्मद उजैफा याने सांगितले की, तो स्वतः “बंगाली खान बाबा” म्हणून लोकांची फसवणूक करीत असे. लोकांच्या अडचणी व श्रद्धेचा गैरफायदा घेऊन उपाय, पूजा–पाठ व पैशांच्या बदल्यात "तांत्रिक उपचार" देण्याचा बनाव करून तो आर्थिक फसवणूक करत होता.
संपूर्ण कागदपत्री प्रक्रिया पूर्ण करून आरोपी व जप्त साहित्य अंधेरी रेल्वे सुरक्षा बल पोस्टकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले.