विरार: - वसईतील भाजप आयोजित कार्यक्रमात महिला पत्रकारावर सार्वजनिक ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी छेडछाड, अश्लील हावभाव आणि अपमानकारक भाष्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.*"जय श्रीराम"*च्या घोषणा देत पत्रकाराचा सन्मान धुळीस मिळवणाऱ्या या गुंडांनी, उपस्थित पोलीस आणि आयोजकांच्या समोरच उघड गुंडशाहीचा खेळ मांडला.प्रत्यक्षदर्शींच्या मते हा प्रकार नियोजित हल्ला होता. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकार दिपक कोटेकर यांनाही धमकावण्यात आले आणि धक्काबुक्की करण्यात आली.हा प्रकार पत्रकारांवरील हल्ला नसून लोकशाही, शब्दस्वातंत्र्य आणि महिला सन्मानावरचा थेट प्रहार असल्याचा संतप्त सूर समाजात उमटला आहे.
महिला संघटनेचा संताप – “सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेत चालते गुंडशाही!”लोकशाही महिला संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करत मिरा-भाईंदर पोलीस आयुक्त व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीचे निवेदन दिले.संघटनेच्या प्रमुख काम्रेड सिता जाधव यांनी म्हटलं –“महिला पत्रकारांवर सार्वजनिक ठिकाणी गुंड प्रवृत्तीने हल्ला करणे हे लोकशाही आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरचे दहशतीचे सावट आहे. हे सहन केले जाणार नाही!”
संघटनेच्या ठाम मागण्या:आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई.महिला पत्रकारावर छेडछाड व अपमानाचे स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत.आरोपींना वसई परिसरातून तडीपार करावे.महिला पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा त्वरित स्थापन करावी.
“रस्त्यावर उतरण्यास आम्ही तयार”लोकशाही महिला संघटनेने स्पष्ट इशारा दिला –“महिलांवरील अत्याचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्यांविरोधात आम्ही प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरणार. हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”वसई तहसिलदार डॉ. अविनाश कोष्टी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.या वेळी काॅ. शेरू वाघ, काॅ. सिता जाधव, काॅ. भारती गुजर, काॅ. पार्वती पाडेकर, काॅ. अरुणा मुकणे, काॅ. अनिरुद्ध मेहेर व प्रशांत धोंडे आणी स्थानिक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या