निर्मळ येथे रविवारी पक्ष प्रवेश सोहळा; लाल बावट्याखाली संघर्षाचा नारा.
(मुलाणी , वसई )
वसई : - वसई तालुक्यातील युवक आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर निर्णायक लढा छेडण्यासाठी येत्या रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ठिक ४ वाजता निर्मळ येथे भाकप (माले – लाल बावटा) तर्फे भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतील अनेक पदाधिकारी तसेच वसई तालुक्यातील काही गावांचे प्रतिनिधी गरिब-शोषितांच्या हक्कांसाठी, संघर्षाच्या मार्गाने पक्षात प्रवेश करणार आहेत.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार हा फक्त प्रवेश सोहळा नसून अन्यायाविरुद्ध जाहीर रणशिंग फुंकणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
तालुक्यातील युवक बेरोजगारी, शिक्षणातील अडथळे, वसाहतींच्या समस्या आणि शेतमजुरांच्या दैनंदिन हालअपेष्टा यामुळे संतापलेले असून या पार्श्वभूमीवरच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम जनतेच्या असंतोषाला संघटित दिशा देणारा टप्पा ठरणार आहे.
याच कार्यक्रमात “लोकशाही युवा संघटनेची तालुका कमिटी” औपचारिकरित्या स्थापन केली जाईल आणि तिचा पहिला अध्यक्ष निवडला जाणार आहे.भाकप (माले – लाल बावटा) जिल्हा सहसचिव काॅ. शेरू वाघ यांनी सांगितले की, “आजची व्यवस्था ही अन्यायाचे कवच बनली आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा म्हणजे त्या कवचावर तुटून पडणारा वार आहे. बेरोजगार तरुण, शेतमजूर, वसाहतीतील उपेक्षित जनता – सगळ्यांनी या लाल झेंड्याखाली संघटित व्हावे. लढा, संघर्ष, क्रांती – हा कार्यक्रम त्याचाच घोष आहे.”या सोहळ्याला सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--------------------------------------------