जंजिरे वसई किल्ल्याचे रोजचे मरण आजही सुरू! — ऐतिहासिक डॉमिनिकन चर्चमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण, नियमांचा फज्जा
(मुलाणी , वसई ) [चैनल - mulani All india News ]
वसई (दि. 23 ऑक्टोबर 2025) —
वसईतील ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ला पुन्हा एकदा बेजबाबदार प्रशासन आणि निष्काळजी पणामुळे चर्चेत आला आहे. आज सकाळी नेमक्या नऊ वाजल्यापासून किल्ल्यातील ऐतिहासिक डॉमिनिकन चर्च परिसरात नवीन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. हे सर्व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नियमांना धाब्यावर बसवून झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून वसईकर, इतिहासप्रेमी आणि गिरीमित्र यांनी या किल्ल्यातील धोकादायक वास्तूंमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रपट, वेब सिरीज किंवा जाहिरात चित्रीकरण पूर्णपणे बंद करावे, अशी मागणी केली होती. तरीदेखील, आज सर्व नियमांना तिलांजली देत पुन्हा चित्रीकरण सुरू झाल्याचे समोर आले आहे.
यावेळी उन्हाचा तडाका लक्षात घेता किल्ल्यातील भिंतींवर दोरखंड आणि कपड्यांचे आच्छादन तयार करण्यात आले होते. मात्र, या भिंती गेल्या शंभर वर्षांपासून डागडूजीशिवाय उभ्या असल्याने त्यांची स्थिती अतिशय नाजूक आहे. चार वर्षांपूर्वी याच चर्चचा एक भाग कोसळला होता, तरी त्याची डागडूजी आजवर करण्यात आलेली नाही.
इतकेच नव्हे, तर वास्तूच्या भिंतींवर आता पिंपळवड आणि झाडे उगवलेली दिसतात, ज्यामुळे संपूर्ण रचना मोडकळीस आली आहे. अशा धोकादायक स्थितीत चित्रीकरणाला परवानगी देण्यात आल्याचे समजते. केंद्रीय पुरातत्व विभागाने या चित्रीकरणास लेखी मान्यता दिल्याचेही वृत्त आहे.
वसई किल्ल्याच्या जतनासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च झाल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येतात, मात्र प्रत्यक्षात त्याचा संवर्धनावर परिणाम शून्य दिसतो. हा निधी नेमका कुठे आणि कशासाठी वापरला जातो, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.
वसईतील सुजाण नागरिक, इतिहासप्रेमी आणि स्थानिक सामाजिक संस्था यांनी या प्रकरणाचा तातडीने पुनर्विचार आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या विषयावर पुढाकार घेत — श्रीदत्त राऊत (मो. 9764316678) यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून, वसईच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
✍️ All India News Mulani.Online, वसई ( मुलाणी )