(मुलाणी , वसई )
विरार :- मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली दि.२४ ऑक्टोबर २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात छठपूजा उत्सव संदर्भात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीस उपस्थितांमध्ये छटपूजा उत्सव संदर्भात विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनाला उत्सव साजरा करणे संदर्भात विविध सूचना केल्या. या सूचनांवर विचारविनिमय करून आवश्यक तेथे लवकरच उपाययोजना करण्याचे निर्देश मा.आयुक्त महोदयांनी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस उपस्थित असलेले मा.आमदार श्री.विलास तरे यांनी मा.न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून कोणाच्याही भावना न दुखवता छटपूजा उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन बैठकीमध्ये केले. उत्सव साजरा करतेवेळी शहर स्वच्छ व सुंदर राहावे याचीही दक्षता नागरिकांनी घ्यावी असे यावेळी मा.आमदार श्री.विलास तरे यांनी सांगितले. पोलीस प्रशासनामार्फतही ट्रॅफिक व गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपस्थित पोलीस उप-आयुक्त श्रीम.पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली. बैठकीत मा.आयुक्त महोदयांनी उपस्थितांना संबोधताना महानगरपालिकेने यावर्षी छठपूजा उत्सवानिमित्त केलेल्या नियोजनाबाबतची माहिती दिली. महानगरपालिकेमार्फत छठपूजा उत्सवानिमित्त महानगरपालिकेतील प्रभाग समिती निहाय विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात येत असून समुद्रकिनाऱ्यांवर देखील महानगरपालिकेमार्फत व्यवस्था करण्यात येत आहे. महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी निर्माल्य कलश, विद्युत व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, सर्व सुरक्षा व्यवस्था व इतर विविध सुविधा महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार असून समुद्रकिनारीही विद्युत व्यवस्था, निर्माल्य कलश, मंडप व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था करण्यात येणार असून त्याचबरोबर समुद्रकिनारी सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षक, अग्निशमन विभागाच्या बोटी व इतर सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी नागरिकांना ये-जा करणेसाठी महानगरपालिकेमार्फत बस सेवा पुरविली जाणार आहे. छठपूजा साजरा करताना नैसर्गिक तलावांमध्ये भाविकांनी कोणत्याही प्रकारचे पूजा सामुग्री व निर्माल्य विसर्जित करू नये असे आवाहन मा.आयुक्त महोदयांनी यावेळी केले. तलावात कुठलेही निर्माल्य, तेलाचे दिवे सोडता येणार नाहीत या अटींवर भाविकांना फक्त अर्ध्य देणेसाठी नैसर्गिक तलावांमध्ये प्रवेश दिला जाईल. प्रवेशावेळी महानगरपालिकेच्या व पोलीस प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून गर्दी न करता शांततेत पूजा करणेची सूचना मा.आयुक्त महोदयांनी यावेळी दिली. मा.आयुक्तांच्या या सूचनेला उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर्षी शहरात पर्यावरण पूरक “गणेशोत्सव” व “नवरात्रोत्सव” साजरा केल्याप्रमाणेच “छटपूजा उत्सव” ही पर्यावरण पूरक पद्धतीने व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्यामार्फत यावेळी करण्यात आले. या बैठकीला मा.आमदार श्री.विलास तरे, मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, मा.पोलीस उप-आयुक्त श्रीमती पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सर्वपक्षीय पदाधिकारी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी इ.उपस्थित होते.