( मुलाणी , वसई )
वसई — गोरबंजारा समाजाच्या वतीने एस.टी. आरक्षणाच्या मागणीसाठी आज वसई येथे भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा वसई एस.टी. डेपो येथून सुरू होऊन तहसील कार्यालयासमोर जाऊन संपन्न झाला.मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत, गाण्याच्या तालावर आणि “जय सेवालाल”च्या घोषणा देत समाजबांधवांनी मोर्चामध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. वसई तालुक्यातील हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.मात्र, तहसील कार्यालयात प्रांताधिकारी व तहसीलदार उपस्थित नसल्यामुळे समाजातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. “अधिकाऱ्यांवर कारवाई करा” अशा घोषणा देण्यात आल्या.सकाळी साडेअकरा वाजता एस.टी. डेपोहून निघालेला मोर्चा दुपारी एक वाजता तहसील कार्यालयासमोर पोहोचला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोशात भाषणे केली आणि सरकारला जागृत करण्याचे आवाहन केले. “जरांगे पाटील आमचे मोठे भाऊ, आम्ही लहान भाऊ — मग आम्हाला वेगळे का?” अशा शब्दांत समाजाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.राज्यात एस.टी. आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून हा मोर्चा काढण्यात आला असून, आगामी काळात महाराष्ट्रभर अशा मोर्च्यांची मालिका सुरू राहील, असे आयोजकांनी सांगितले.मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी योग्य त्या बंदोबस्ताची व्यवस्था केली होती. एसीपींसह पोलीस दलाने कायद्याच्या चौकटीत राहून शिस्तबद्धपणे सुरक्षा पुरवली.“जय सेवालाल”च्या जयघोषात आणि उत्साही वातावरणात हा मोर्चा यशस्वीपणे संपन्न झाला.
///////////////////////////////////////