मुलाणी ,वसई
वसई-विरार:- रेबीज हा एक प्राणघातक आजार आहे. हा आजार प्रथमोपचार, लसीकरण आणि रेबीज इम्युनोग्लोबुलीनच्या मदतीने टाळता येतो. रेबीजमुळे दरवर्षी १५० हून अधिक देशांमध्ये अंदाजे ५९,००० मानवी मृत्यू होतात, ज्यापैकी ९५% प्रकरणे आफ्रिका आणि आशियामध्ये आढळतात. बऱ्याचशा मृत्यूंचे कारण हे या आजाराबद्दल तसेच संसर्गानंतरच्या उपचार पद्धतीबद्दल नागरिकांना माहिती नसणे हे आहे. रेबीज आजार होण्यामागील प्रमुख घटक म्हणजे लसीकरण न केलेले भटके श्वान किंवा रस्त्यावरील श्वान. रेबीज आजाराशी लढण्यासाठी आणि २०३० पर्यंत त्याचे पूर्णपणे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली यांनी रेबीज निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती योजना (NAPRE) ची संकल्पना मांडली. देशात नियमितपणे श्वानांचे लसीकरण करणे आणि संसर्गानंतर उपचारांद्वारे रेबीज हळूहळू कमी करणे आणि शेवटी पूर्णपणे नष्ट करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. वसई विरार शहर महानगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग, वसई तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात तसेच पालघर जिल्हा कार्यक्षेत्रात भटक्या श्वानांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. प्राण्यांची काळजी, आहार आणि कल्याण यामध्ये सहभागी असलेल्यांनी तसेच स्वयंसेवक, सामुदायिक कार्यकर्त्यांनी, निवासी सोसायटी ज्यांना त्यांच्या श्वानांचे लसीकरण करायचे आहे, त्यांनी ‘रेबीजमुक्त वसई-विरार’ मोहिमेसाठी सहकार्य करण्याची विनंती प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. यासाठी खाली दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून प्राप्त होणारा फॉर्म भरण्यात यावा. सदर भरलेल्या फॉर्ममधील तपशील संबंधित स्वयंसेवी संस्थांना पाठविण्यात येतील व संस्थेमार्फत भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी संबंधित अर्जदारास संपर्क साधण्यात येईल. रेबीज प्रतिबंधक लसीकरण हे NAPRE - मानक कार्यप्रणाली – परिशिष्ट ७ नुसार केले जाईल. यासंदर्भात अधिक माहितीसाठी Community One Health Officer, Mission Rabies - 9834177266 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती प्राप्त करून घेता येईल.
------------------------------------------------------------------------