- All India News Mulani . online

All India News Mulani . online

All India News Mulani


ऑल इंडिया न्यूज हिन्दी एवं मराठी में ऑनलाइन समाचार

33-0138922 नं .उदयम महा

All India News S M S कलेक्शन, भाईंदर ( ईस्ट ) BP रोड रेल्वे स्टेशन के बाजु में प्रशांत हॉटेल, सुरभी के सामने, मेडीकल के बाजु मे ( शाहरुख मुलाणी- mob.7021052733 ) . NEWS WEBSITE,, YouTube channel,, NGO,, संबंधित सभी सेवाएं प्रदान करते है , सेवाएं लेने के लिए व्हाट्सअप किजिए 7378342192, ZARA DIGITAL MARKETING

Editor : -Nazir Mulani con.8796706999

Nazir Mulani ऑल इंडिया न्यूज

Friday, March 6, 2026


कोकणच्या चवी, ग्रामीण कलेचा संगम : विरार येथे ‘कोकण व विभागीय सरस 2026’

दिनांक- 6/3/ 2026 वार- शुक्रवार (मुख्य संपादक नजीर मुलाणी, वसई)मो.नंबर 8796706999
 (मुलाणी, वसई) 
कोकणच्या अस्सल चवी, ग्रामीण संस्कृतीचा सुगंध आणि महिला स्वयंसहायता समूहांच्या कर्तृत्वाचा उत्सव अनुभवण्याची संधी आता विरारकरांना मिळणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय (विकास शाखा) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद पालघर आणि वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण व विभागीय सरस 2026’ या भव्य विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन म्हाडा मैदान (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स), जकात नाका, विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर येथे 12 ते 16 मार्च 2026 दरम्यान दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत करण्यात आले आहे.
ग्रामीण महिलांच्या हातगुणांना आणि त्यांच्या उद्यमशीलतेला व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनात स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ, पारंपरिक मसाले, ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग, कापडी पिशव्या तसेच विविध हस्तनिर्मित उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कोकणातील पारंपरिक कला आणि संस्कृतीचे दर्शनही या मेळाव्यातून घडणार आहे.
या मेळाव्यात कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील स्वयंसहायता समूहांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असून एकूण 150 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद पालघर – 60 स्टॉल, वसई-विरार महानगरपालिका – 50 स्टॉल, रायगड – 10 स्टॉल, ठाणे – 10 स्टॉल, रत्नागिरी – 10 स्टॉल आणि सिंधुदुर्ग – 10 स्टॉल असा सहभाग असणार आहे. त्यापैकी 30 स्टॉल खाद्यपदार्थांसाठी, तर 120 स्टॉल विविध हस्तकला, प्रक्रिया उद्योग आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी असणार आहेत.
या मेळाव्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीची मेजवानी. सिंधुदुर्ग ते मोखाडा या कोकण पट्ट्यातील ग्रामीण चवींचा आस्वाद येथे घेता येणार आहे. पुरणपोळी, उकडीचे मोदक, घावणे, रस शिरवाळे, कोंबडी-वडे, नाचणीच्या भाकरी यांसारख्या पारंपरिक पदार्थांमधून ग्रामीण घरगुती पाककलेचा अस्सल स्वाद नागरिकांना अनुभवता येणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी प्रदर्शनस्थळी नियंत्रण कक्ष तसेच आरोग्य कक्षाची व्यवस्था करण्यात आली असून या मेळाव्यामुळे महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवे बळ मिळणार आहे.
तरी नागरिकांनी 12 ते 16 मार्च 2026 या कालावधीत विरार येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांची खरेदी करावी तसेच कोकणच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Thanks for your