(मुलाणी, वसई)
वसई : दि.८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दि.१० मार्च २०२६ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात महिला दिन विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या Savitribai Phule यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.महिला दिनाचे औचित्य साधत कार्यक्रमात महिलांना विशेष सन्मान देण्यात आला. यावेळी महापौर अजिव पाटील यांनी उपस्थित मान्यवर महिलांना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली, तर स्वतः इतर मान्यवरांसह प्रेक्षकांमध्ये बसण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीचे उपस्थित महिलांकडून कौतुक करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर नगरसेविका, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच आयुक्तांच्या पत्नी श्रीमती मीना सूर्यवंशी यांच्यासह सर्व मान्यवर महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उपआयुक्त स्वाती देशपांडे यांनी प्रास्ताविक करत महिला दिनाचे महत्त्व सांगितले तसेच महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्याबाबत व विविध प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.यावेळी महानगरपालिकेत विशेष कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वैद्यकीय विभागातील परिचारिका तसेच महिला सुरक्षा रक्षक यांचा त्यात समावेश होता.महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष आरोग्य शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी नृत्य, गीत आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यास मदत झाली.या कार्यक्रमाला महापौर अजिव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती प्रविण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
===============================..======
No comments:
Post a Comment
Thanks for your