नजीर मुलाणी ,वसई )
(मुलाणी ,वसई )
विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने विरार पूर्व परिसरात अवैधरित्या डोनर स्पर्म साठवणूक व विक्री करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करत मोठा भंडाफोड केला आहे. या प्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सहाय्यक प्रजनन (नियमन) तंत्रज्ञान अधिनियम २०२१ आणि सरोगसी (नियमन) अधिनियम २०२१ या कायद्यांची अंमलबजावणी केली जाते. विभागाला मिळालेल्या माहितीनुसार विरार पूर्व येथील पद्मीबाई टॉवर, एन. पी. रोड, सबवे समोर असलेल्या “Jivdani Scientific Co.” या ठिकाणी अवैधरित्या डोनर गॅमेट्स विक्री होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त (वैद्यकीय आरोग्य) आणि उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य) यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी वैद्यकीय पथक गठीत करून तपासणीचे आदेश दिले.त्यानुसार ९ मार्च २०२६ रोजी वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी भेट देऊन तपासणी केली. तपासणीदरम्यान ही कंपनी मयुर भागवत संखे आणि कमलेश शंकर खुत यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. तसेच जागेची पाहणी केली असता एका Cryoseal Cryogenic Container मध्ये डोनर स्पर्म साठवून ठेवलेले आढळून आले. या कंटेनरमध्ये एकूण ४५ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन डोनर स्पर्म व्हायल्स सापडले.प्राथमिक चौकशीत आरोपींनी डॉक्टर, रुग्णालय किंवा एजंट यांच्याकडून दूरध्वनीवर स्पर्म डोनरची मागणी आल्यानंतर आपल्या एजन्सीमार्फत डोनर स्पर्म नमुने पुरवठा केल्याची कबुली दिल्याची माहिती वैद्यकीय पथकाला मिळाली.सदर ठिकाण सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम २०२१ अंतर्गत एआरटी बँक म्हणून नोंदणीकृत नसतानाही तसेच कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसताना डोनर स्पर्म साठवणूक करून त्याचा व्यापार केला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधितांविरुद्ध विरार पूर्व येथील पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.वसई-विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने नागरिकांना अशा अवैध वैद्यकीय सेवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
======================================
No comments:
Post a Comment
Thanks for your